
हरविलेले अल्पवयीन बालक 7 महिन्यानंतर परतले स्वजिल्ह्यात
हरविलेले अल्पवयीन बालक 7 महिन्यानंतर परतले स्वजिल्ह्यात
बाल संरक्षण समिती व पोलिसाच्या प्रयत्नांना यश
वर्धा, दि.9 (जिमाका) : जिल्ह्यातील तळेगाव पोलिस स्टेशन हद्दीत दि.8 ऑक्टोंबर 2024 रोजी अल्पवयीन बालक आढळून आला होता. सदर बालकांच्या कुंटूबियांचा जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलिस विभागाने तब्बल 7 महिन्याच्या प्रयत्नाने शोध घेऊन छत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात बालकास परत पाठविण्यास यश प्राप्त झाले.
पोलिस स्टेशन तळेगाव शामजीपंतच्या हद्दीत दि. 8 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान एक अल्पवयीन बालक सापडला होता. बालकास पोलिस स्टेशन तळेगावने बाल कल्याण समितीच्या समक्ष सादर केले होते. बालकाला काळजी व संरक्षणाची गरज लक्षात घेता बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालकास श्रीछाया बालगृह येथे दाखल करण्यात आले. बालकाच्या आईवडीलांचा शोध घेण्यासाठी व पुनर्वसनाच्या दृष्टीने वृत्तपत्रात प्रसिध्दी देऊन प्रयत्न करण्यात आले. परंतू नातेवाईकाबाबत कुणीही संपर्क साधला नाही.
याबाबत बाल कल्याण समितीने बालकाच्या पुनर्वसनाबाबत कार्यवाही करावी, असे सुचित केल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत समुपदेशक आरती नरांजे यांनी बालकाची माहिती घेतली असता सदर बालकाकडुन योग्य व खरी माहिती मिळालेली नाही. याबाबत संरक्षण अधिकारी वैशाली मिस्कीन यांनी पेालिस स्टेशन यांच्याशी संपर्क केला असता पोलिस विभागाने सदर बालकाचे कौटूंबिक नातेवाईक खरसिया रायगढ जिल्हा राज्य छत्तीसगढ येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे बालकाचे नविन आधार कार्ड काढण्यात आले. श्रीछाया बालगृहातील अधिक्षक रुपाली फाले यांनी बालकांशी संवाद साधुन व बालकाला विश्वासात घेवुन मिळालेली माहिती ही खरी आहे काय याबाबत विचारणा करण्यात आली. तसेच रायगढ जिल्हयातील जिल्हा बाल संरक्षण कक्ष व खरसिया पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी संपर्क करुन बालकाच्या कुटुंबाची माहिती प्राप्त करुन सहानिशा करण्यात आली. समितीच्या आदेशाने बालकाला दिनांक 7 मे 2025 रोजी बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन व बालगृह यांच्या माध्यमातुन चाईल्ड लाईन मधील पुरुषोत्तम कांबळे, बालगृहातील आदेश राठोड व पोलिस कर्मचारी अंकुश कुरवडे यांच्या सोबत बालकास स्वजिल्हयात पाठविण्यात आले.
महिला व बाल विकास विभाग, पोलिस विभाग यांच्या यशस्वी प्रयत्नाने हरविलेल्या बालकाला 7 महिण्यात स्वजिल्ह्यात पाठविण्यात यश प्राप्त झाले. संपुर्ण कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही हरविलेले बालक आढळल्यास त्याची माहिती 1098 या टोल फ्री क्रमांकावर तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास द्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केलेले आहे.
000000