*अन्नदात्या, तुझे मरण टळत कसे नाही…*

अन्नदात्या, तुझे मरण टळत कसे नाही…*
*जिल्ह्यात 25 वर्षांत 2700 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; गेल्या 5 महिन्यांत शंभरावर आत्महत्या*

प्रवीण धोपटे
वृत्त विश्लेषण
वर्धा. यवतमाळचे शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी, मुलाबाळांसह वर्धा शहरालगतच्या दत्तपूर परिसरात आत्महत्या केली, त्या हृदयद्रावक घटनेला 39 वर्षे उलटून गेलीत. ती महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या, अशी सरकार दरबारी नोंद आहे. त्यानंतरच्या प्रदीर्घ काळात शेतकरी आत्महत्यांची वार्ता कानी पडणे यंत्रणेसह सर्वांच्याच अंगवळणी पडले. आपल्या श्रमाला मोल अन् जीवनमरणाशी कुणाला सोयरसुतक नसल्याची जाणीव, अंतहीन वेदना मनाच्या खोल कप्प्यात दडवून अन्नदाते आत्महत्या करीत आहेत. जगाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे आत्मबलिदान आंदोलन आजही दुर्लक्षित आहे.
एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील 25 वर्षांच्या काळात 2700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मरण जवळ केले. ही शासकीय आकडेवारी आहे. त्यामुळे हा आकडा त्यापेक्षा भयावह असू शकतो. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी-मुलाबाळांची, आई-वडिलांची, इतर अवलंबित्वांची जी अंतहीन फरपट झाली असेल, दुःख, वेदना, अभावांचा जो पाट वाहिला असेल त्याची कोणी नोंद घेतली असेल का…
राज्य सरकार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला निकषांत पात्र ठरत असेल तर वर्षानुवर्षांपासून 1 लाख रुपये देऊन मोकळे होत आले आहे. सत्ता कुण्याही पक्षाची, पक्षांच्या आघडीची असो, या दानशुरतेत बदल झालेला नाही. जिल्ह्यात 80 टक्के शेती कोरडवाहू शेती आहे. निसर्गावर अवलंबित्व, आभाळमायेची आस, सरकार-बाजारपेठेची कृपादृष्टी या चक्रातून शेतकऱ्यांची कधीच सुटका झाली नाही. कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी जणू शेतकऱ्यांसाठीच लिहून ठेवलेय… “मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…”
कोणत्याही सरकारची धोरणे, निर्णय, अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याला ताठ मानेने जगू देत नाही. समाजातील त्याच्याशी निगडित घटक तरी त्याला तगू देतात काय..? त्याच्या कष्टाचे पीक ओरबाडून घेतले जाते. धान्य, फळपीक, कापूस वा भाजीपाला मातीमोल भावात विकण्यास त्याला भाग पाडले जाते. बाजारात भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी अनेकदा कवडीमोल भाव पाहून उद्विग्न होत तो रस्त्यावरच फेकून देतात, गुरांना चारा म्हणून वाढून देतात… आपण त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेत त्यांचा जीव गुदमरतोय, त्यांची चिल्लेपिल्ले बाजारात शेतमाल विकून बाबा आपल्यासाठी काही आणतील म्हणून आस लावून बसत असतील. इकडे अन्नदाता हताश होऊन तडफडून जीव सोडतो. आपण त्याच्या मुलाबाळांची हाय खात आहोत, त्यांच्यावर भयंकर अन्याय करुन त्यांनीच पिकविलेले अन्न खात सल्ले देत सुटलोय…
जिल्ह्यातील ज्या 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ते तर कुटुंबाला पोरके करून नेहमीसाठी मुक्त झाले; पण लाखो शेतकरी जिवंतपणीच मरणयातना भोगत आहेत, त्यांचे काय..?
००००००००००
*सारेच तगतात, मग तोच का..?*
साधा पानटपरी चालविणारा, हातगाडीवर भाजी विकणारा, शेतातून उत्पादित मालावर हंगामी व्यवसाय करणारा, शासकीय-खासगी क्षेत्रांत कनिष्ठ पदावर कार्यरत असलेलाही जगतो, कुटुंबही पोसतो; मग वर्षभर शेतात राबणारा, निसर्ग-व्यवस्थेशी झुंजणारा शेतकरी अखेर का हतबल होतो, हरतो..? याचे शासन, प्रशासन, समाज अन् अन्नदात्याच्या निढळ घामावर पोसलेले आपण सर्व कधीतरी उत्तर देणार आहोत काय..?
०००००००
*पणत्या पेटल्या, त्या मशाली व्हाव्या!*
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता अनेक सामाजिक संस्था-संघटना, व्यक्ती, समूह जबाबदारीच्या जाणिवेने मदतीला धावून येत आहेत. “वो सुबह कभी तो आयेगी…” या विश्वासाने शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी ज्या पणत्या पेटल्या आहेत, त्या मशाली व्हाव्यात, केवळ एवढीच अपेक्षा !


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles