
सावंगी परिसरात अवैध धंद्यांवर लगाम; नव्या ठाणेदाराच्या संयमी कारवाईमुळे शांतीचं वातावरण
सावंगी परिसरात अवैध धंद्यांवर लगाम; नव्या ठाणेदाराच्या संयमी कारवाईमुळे शांतीचं वातावरण
वर्धा (प्रतिनिधी):
सावंगी (मेघे) परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अवैध दारू विक्री, नकली दारू निर्मिती, डिझेल-पेट्रोल चोरी आणि तांदूळ चोरीसारखी गैरकृत्यं अचानक थांबलेली दिसत आहेत. यामागे कोणत्याही धाडसी कारवाईचा डंका नाही, ना कोणतंही मोठं ऑपरेशन — हे सगळं घडलं आहे नव्याने नियुक्त झालेल्या ठाणेदार वाघोडे यांच्या शांत आणि समजूतदार नेतृत्वामुळे.
सावंगी परिसरात मागील काही काळापासून खुलेआम दारू विक्री होत होती. काही ठिकाणी नकली दारू तयार करण्याचे अड्डेही उघडकीस आले होते. गुन्हे शाखेने या प्रकरणात काही वेळा हस्तक्षेप केला, मात्र स्थानिक पोलीस ठाण्याची भूमिका ठोस नव्हती. परिणामी नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली होती.
पण ठाणेदार वाघोडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या धंद्यांवर शिस्त लावण्यात आली. कुठलाही वाजागाजा न करता, केवळ प्रेमपूर्वक समज देऊन आणि शिस्तबद्ध संवादातून अवैध व्यावसायिकांमध्ये बदल घडवण्यात आला. यामुळे अनेकांनी आपले धंदे स्वयंस्फूर्तीने बंद केले आणि परिसरात गोंधळाऐवजी शांतता पसरली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून नादुरुस्त होता. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले होते, पण कुणीही ठेकेदारावर कारवाई केली नव्हती. मात्र ठाणेदार वाघोडे यांनी ठेकेदाराला समजावून सांगत रस्ता तातडीने सुरळीत करून घेतला.
आता नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येत आहे. पोलिसांच्या या कार्यक्षम दृष्टीकोनामुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
फार पूर्वीपासून परिसरात डिझेल व पेट्रोल चोरी, तांदूळ माफिया, आणि अन्य आर्थिक गुन्ह्यांचा सुळसुळाट होता. पण नव्या पोलीस नेतृत्वामुळे हे सर्व प्रकार थांबले आहेत. कोठेही कोणतीही धडक कारवाई केली गेली नसतानाही आज सावंगी परिसरात कायद्याचं आणि सुरक्षिततेचं वातावरण दिसत आहे.
ठाणेदार वाघोडे यांच्या संयमित, मृदू पण प्रभावी धोरणामुळे जनतेचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे. “शिस्त असली की धाक देण्याची गरज नसते” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे.