
भाग २ : वर्धा बांधकाम क्षेत्रातील सावळा गोंधळ — आता आणखी गंभीर प्रकरणे उघडकी

भाग २ : वर्धा बांधकाम क्षेत्रातील सावळा गोंधळ — आता आणखी गंभीर प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता
वर्धा :(मंगेश चोरे)
शहराच्या बांधकाम क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. वैष्णवी बिल्डर्सचे मालक प्रदीप रिठे यांनी रेरा कायद्याचे सर्रास उल्लंघन करून अनेक प्रकल्पांची विक्री केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शहरातील अनेक नागरिकांनी आपापली प्रकरणे पुढे आणण्यास सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे, रिठे यांनी केवळ एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातच आपले बहुतेक प्रकल्प राबवले असल्याचे तपासातून समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यावरही आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असताना विक्री अधिकाऱ्यांनी व्यवहार मंजूर कसे केले? हा प्रश्न आता महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून समजते की, वर्धा येथील बिल्डर संघटनेत निर्माण झालेल्या वादानंतर काही बागी सदस्यांनी महसूल मंत्र्यांपर्यंत ह्या प्रकरणाची माहिती पोहचवली आहे. परिणामी, पुढील काळात आणखी अनेक गंभीर प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या सर्व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सर्वसामान्य ग्राहक मात्र भरडला जाण्याची शक्यता आहे. आपले घर, आपला फ्लॅट म्हणून व्यवहार केलेल्या अनेकांनी बोगस व्यवहारात फसण्याचा धोका उभा ठाकला आहे.फक्त वैष्णवी बिल्डर्सच नव्हे, तर शहरातील माहाकालकर यांचेही काही संशयास्पद व्यवहार पुढे आणण्यासाठी काही नागरिकांनी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा सावळा गोंधळ आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.रेरा कायद्याचे सातत्याने होणारे उल्लंघन आणि बांधकाम क्षेत्रातील बेकायदेशीर कामकाजावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी आता शहरातील नागरीक, सामाजिक संस्था आणि काही राजकीय मंडळी करीत आहेत.