
केचे यांच्या वागणुकीत बदल? – मंत्रीही म्हणाले, “तब्येत ठिक आहे ना?”
केचे यांच्या वागणुकीत बदल? – मंत्रीही म्हणाले, “तब्येत ठिक आहे ना?”
वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे) विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांच्या अलीकडील वागणुकीत झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता आणि चर्चा निर्माण झाली आहे.
सामान्यतः संयमी आणि मोजकं बोलणारे केचे सध्या आक्रमक, बिनधास्त आणि अनपेक्षित शैलीत वागत असल्याचे अनेकांनी जाणवले आहे.मागील काही दिवसांत त्यांनी रस्त्याच्या कामावर तात्काळ उपस्थिती लावून, रागाच्या भरात काम बंद पडलं म्हणून बाजूला ठेवलेली सब्बल स्वतः उचलून काम सुरू केल्याचा प्रकार घडला.
याशिवाय, सभागृहात अनपेक्षित प्रश्न विचारणे, रेतीघाटांवर प्रत्यक्ष जाऊन छापे घालणे, आणि पक्षीय बैठकीत अतिशय तणावपूर्ण मुद्रा दाखवणे – हे सर्व वागणे त्यांच्या पूर्वीच्या शैलीपासून पूर्णपणे वेगळे असल्याचे निरीक्षण आहे.हीच पार्श्वभूमी असताना नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेतच विचारणा केली,“केचे साहेबांची तब्येत बरी आहे ना?”त्यांच्या या मिस्कील परंतु मुद्देसूद प्रश्नामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे तरंग पसरले, मात्र त्याचवेळी हा प्रश्न मूलभूत चिंतेकडेही लक्ष वेधणारा ठरला., विधानसभेच्या उमेदवारीतून वंचित राहिल्याने केचे यांनी काही काळ राजकीय संन्यास घेण्याचा विचार केला होता. मात्र, नंतर विधानपरिषदेमार्फत त्यांनी पुनरागमन केलं.
त्यानंतरचा त्यांचा कार्यशैलीतील बदल, ही निव्वळ कार्यक्षमतेची उत्स्फूर्ती आहे की मानसिक तणावाची प्रतिक्रिया – यावर मात्र मतभेद आहेत त्यांच्या या वागणुकीवरून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काहींच्या मते केचे अधिकच जबाबदारीने काम करत आहेत, तर काहींना वाटते की हा दबावातून आलेला “ओव्हर रिअॅक्शन” आहे.
विरोधकांनी मात्र ही संधी साधत, “आमदार अस्थिर मानसिकतेत आहेत का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.ज्या नेत्याकडून मतदारांना आशा असते, त्यांच्या वागणुकीत असा झपाटलेला बदल हा केवळ चर्चेचा विषय नाही – तर आत्मपरीक्षणाची गरज निर्माण करणारा प्रसंग आहे.नेतृत्व, निर्णयक्षमता आणि स्थैर्य यांचं संतुलन टिकवून ठेवणं, हेच राजकारणात यशाचं खरं सूत्र असतं.आणि झालेला बदल स्पष्ट दिसत आल्याने सर्व म्हणतात कूच तो गडबड है बुडू…..