
विकास हवे की आकस?” – आर्वीच्या मतदारांचा प्रश्न!
“विकास हवे की आकस?” – आर्वीच्या मतदारांचा प्रश्न!
वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे): सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न मांडले जात असताना आर्वी विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. मतदारसंघातून निवडून आलेले सध्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी कृषी, अवकाळी पाऊस, वन्यप्राणी व नुकसान भरपाईसंदर्भात विधानसभेत मुद्दे प्रभावीपणे मांडले. मात्र, याच मतदारसंघातील माजी आमदार तथा सध्या विधान परिषदेचे सदस्य असलेले केचे यांनी रेती चोरीसारखा मुद्दा उपस्थित करून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी विचारले आहे की – आर्वीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज, पाणी, रस्ते, बाजारपेठ यासारखे मूलभूत प्रश्न असताना रेतीचोरांच्या अटकेच्या मागणीस प्राधान्य देणे योग्य आहे का?
आमदार वानखेडे यांनी विधानसभेत आर्वी, आष्टी, कारंजा परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, संत्रा पिकाची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव, शेतीसाठी रस्ते व वीज, तसेच वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात उपाययोजनांची मागणी यांसारखे जनतेच्या खऱ्या हिताचे प्रश्न मांडले.
परंतु दुसरीकडे, केचे यांनी विधान परिषदेतील वेळ वापरत रेतीच्या ढिगाऱ्यांचे निरीक्षण आणि चोरांना अटक न झाल्याबद्दल सवाल करत विकासाच्या मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित केल्याचा आरोप स्थानिक स्तरावरून होत आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी देखील या मुद्द्याला “फाजील” असे उत्तर दिले, यावरून विधानपरिषदेत प्रश्न किती गंभीर की गरिबा-विरोधी होते, हे स्पष्ट होते.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, “आज आमच्याच भागातून दोन आमदार आहेत, एक विधानसभेत आणि एक विधानपरिषदेत, पण एका बाजूने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात असताना दुसरीकडे केवळ कुरघोडी करण्यासाठी वेळ वाया घालवला जात आहे.”
आज आर्वी मतदारसंघात तिळ, कांदा, भाजीपाला, संत्रा यासारखी उत्पादने घेतली जातात. पण अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी संकटात सापडले आहेत.त्यांना आर्थिक मदतीची, आणि प्रशासनाकडून तत्परतेची अपेक्षा आहे.
जनतेचा रोख आहे – “दादा, विकास बोला… आकस नव्हे!”