
संकटाच्या वेळी प्राणवायूसाठी ‘सिरींज नेब्युलायझर’!
संकटाच्या वेळी प्राणवायूसाठी ‘सिरींज नेब्युलायझर’!
वीज नसतानाही काम करणारे नवकल्पनात्मक उपकरण – विद्यार्थ्यांचा अभिनव प्रयोग
नागपूर : आपत्तीच्या किंवा अत्यंत अडचणीच्या ठिकाणी वीज नसल्यानं श्वसनाच्या त्रासाने पीडित रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा स्थितीतही प्राणवायू (ऑक्सिजन) संबंधित औषधांचा पुरवठा शक्य व्हावा, यासाठी सिरींजवर आधारित नेब्युलायझर तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूरच्या सहकार्याने हे नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे.
या उपक्रमांतर्गत एमबीबीएस तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी शुभदा पाकडे आणि तनिष्क भुजाडे यांनी डॉ. सतीश देवपुजारी व डॉ. रश्मी उद्दनवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिरींज नेब्युलायझरचे डिझाइन आणि निर्मिती केली आहे. या उपकरणासाठी कोणत्याही विजेची आवश्यकता नसते. त्यामुळे हे उपकरण ग्रामीण भाग, पूरग्रस्त भाग तसेच संघर्षप्रवण क्षेत्रांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कसे कार्य करते हे उपकरण?
या उपकरणात साधी सिरींज, सुई आणि हवेचे इनलेट वापरून एरोसोल स्वरूपातील औषध तयार केले जाते. रुग्णाच्या श्वसनमार्गातून औषधाचा प्रवेश होतो, जो सामान्य नेब्युलायझरसारखाच प्रभावी असतो. हे उपकरण निर्जंतुक करता येण्यासारखे, कमी खर्चाचे आणि सहज उपलब्ध रुग्णालयीन साहित्य वापरून तयार करता येते.
तांत्रिक परीक्षण आणि विश्वासार्हता
या उपकरणाच्या ड्रॉपलेट साईझचे विश्लेषण व तांत्रिक चाचण्या डॉ. रश्मी उद्दनवाडीकर, डॉ. सुशांत नायक आणि संशोधक ज्योती ठाकूर यांच्या मदतीने करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे याचे शास्त्रीय मूल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
आपत्तीच्या काळात जीव वाचविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या या सुलभ आणि किफायतशीर उपकरणाने वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन दिशा दाखवली आहे.