
ट्रॅक्टर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू… सालोड-वडद नाल्यातील घटना; प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
ट्रॅक्टर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू…
सालोड-वडद नाल्यातील घटना; प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह…..
वर्धा (प्रतिनिधी) : सालोड गावातील पाच ट्रॅक्टर रेती वाहतूक करण्याच्या उद्देशाने नजीकच्या वडद नाला येथे गेले होते. मात्र, काल सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नाल्यात प्रचंड पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सर्व ट्रॅक्टर नाल्यात अडकले. काही क्षणातच ते पूर्णपणे पाण्याखाली दबून गेले.
रात्रभर ट्रॅक्टर नाल्यातच अडकून राहिले. आज सकाळी पाणी ओसरताच ट्रॅक्टर बाहेर काढण्याची शर्यत सुरू झाली. बातमी लिहेपर्यंत कोणतेही ट्रॅक्टर बाहेर काढता आले नव्हते. सध्या ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रेती वाहतुकीवर नियंत्रण न ठेवता अशी बेकायदेशीर हालचाल सुरू असणे, तसेच यामध्ये स्थानिक स्तरावर काही अधिकाऱ्यांचे “मासिक देणगी” घेतल्याचे बोलले जात असल्याने चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.