
तांदुळ माफियांचा पत्रकारांवर प्राणघातक हल्ला : एकाला अटक, प्रकरणाचा तपास सुरू
तांदुळ माफियांचा पत्रकारांवर प्राणघातक हल्ला : एकाला अटक, प्रकरणाचा तपास सुरू
वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा-पुलगाव मार्गावरील सालोड चौकात काल रात्री तांदुळ माफियांनी दोन पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर सावंगी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रहीम याला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील एका दैनिकाचे प्रतिनिधी व त्यांचे पत्रकार मित्र पुलगावला जात असताना त्यांच्या वाहनात तांत्रिक बिघाड झाला. वाहन दुरुस्त करत असताना अचानक एक चारचाकी वाहन घटनास्थळी थांबले. त्या वाहनातून उतरलेल्या रहीम नावाच्या व्यक्तीने “तुम्ही कोणाला टिप देता?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी अफसर नावाचा दुसरा व्यक्ती मोटारसायकलवरून आला व त्याने लोखंडी रॉडने पत्रकारांवर हल्ला चढवला.
पत्रकारांनी प्रसंगावधान राखत सावंगी पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने पोलिस पथक पाठवून आरोपी रहीम याला अटक केली. अफसरसह इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
सदर प्रकरणात पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय दंड संहितेनुसार प्राणघातक हल्ला, धमकी आणि शिवीगाळ आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना अत्यंत निदनीय असून पत्रकार संघटनांसह अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने इतर आरोपींच्या अटकेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कठोर कारवाईची गरज आहे, अन्यथा अशा घटना पत्रकारांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.