
मोतिबिंदू विहरीत अभियानास उत्तम प्रतिसाद : पहिल्याच शिबिरात नागरिकांची उसळलेली गर्दी
मोतिबिंदू विहरीत अभियानास उत्तम प्रतिसाद : पहिल्याच शिबिरात नागरिकांची उसळलेली गर्दी
डोळ्यांची मोफत तपासणी, शस्त्रक्रियेची सोय, चष्मे व औषधांचे मोफत वाटप
वर्धा, (प्रतिनिधी) :
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘मोतिबिंदू विहरीत अभियान’ या अभिनव उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्धा येथील चरखागृह परिसरात पार पडला. या पहिल्याच शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.
शिबिरात डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचविलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तपासणीसाठी प्रत्येक कक्षात आरोग्य विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. शिस्तबद्ध पद्धतीने महिला आणि पुरुषांची स्वतंत्र नोंदणी केली जात होती. तपासणी करून आवश्यक रुग्णांना औषधोपचारासह मोफत चष्मेही देण्यात आले.
याशिवाय आयुष्मान भारत नोंदणी, असंसर्गजन्य आजार तपासणी, हृदयविकार तपासणी, ईसीजी, नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी, सामान्य वैद्यकीय तपासणी व औषध वाटपासाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी माहितीपूर्ण स्टॅंडी व बॅनरही लावण्यात आले.
रुग्णांचा अनुभव बोलका :
“प्रसारमाध्यमांतून या शिबिराची माहिती मिळाली आणि मी वाटखेडा येथून येथे आलो. माझ्या उजव्या डोळ्याने धुसर दिसत होते. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि योग्य मार्गदर्शन केले. दोन डोळ्यांचे ड्रॉप दिले. मी नक्कीच शस्त्रक्रिया करणार आहे,” असे मत रुग्ण प्रमोद माधोराव निधेकर (रा. वाटखेडा, ता. देवळी) यांनी व्यक्त केले.
या अभियानामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचारांची सोय उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे उपक्रम आरोग्य क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करणारे ठरत आहेत.