
पोलिसांच्या वागणुकीने संताप.
“कायदा रक्षक की त्रासदायक?” — पोद्दार बगीच्या परिसरात पोलिसांच्या वागणुकीने संताप.
वर्धा | प्रतिनिधी
आज रात्री साधारणतः 8.15 वाजता दयालनगर परिसरात पोलिसांनी एका दारू विक्री प्रकरणावर छापा टाकण्यासाठी वाहनासह धाड टाकली. परंतु या कारवाईपेक्षा नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी गोष्ट काही औरच होती.रेडसाठी गेलेले पोलिस आपले वाहन सरळ रस्त्यात आडवे उभे करून रस्त्यावर खुर्च्या टाकून निवांत बसले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू असतानाही, पोलिस कर्मचाऱ्यांना ना त्या वाहनांची चिंता ना त्या लोकांचा विचार.एवढंच नव्हे तर, एका रुग्णवाहिकेला देखील रस्ता मिळेना. वारंवार हॉर्न मारूनही पोलिसांनी आपल्या खुर्च्या आणि आरामदायक स्थिती सोडण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. आजारी व्यक्तीच्या वेदना, नातलगांचा उतावळेपणा आणि त्या गोंधळात उभा असलेला पोलिसांचा वाहन — या सर्वांचे दृश्य काळजाला चटका लावणारे होते.”कायदा हा सर्वांकरिता समान असतो,” हेच शिकवणारे पोलिस जर रस्त्यावर अडथळा बनत असतील, तर लोक काय विश्वास ठेवतील यंत्रणांवर? वाहतूक पोलिस जर तीनजण मोटारसायकलवर असलेल्या तरुणांना पकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करू शकतात, तर स्वतः पोलिस कर्मचारी राजरोज तीन तीनजण बसून फिरताना कोणते नियम पाळतात? रस्त्यावर थांबलेल्या वाहनामुळे अनेक वृद्ध वाहनचालकांनी मोठा त्रास सहन करत आपल्या वाहनांना रिव्हर्स घेत पुन्हा मार्ग काढावा लागला. ही केवळ वाहतुकीची अडचण नव्हे, तर सामान्य माणसाच्या संयमाची आणि सहनशीलतेची परीक्षा होती. फोटो बघा — रस्त्यात पोलिसांचे वाहन, बाजूला खुर्च्या आणि गोंधळलेले नागरिक.
ही कृती फक्त एका कर्मचाऱ्याची नसून, संपूर्ण पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन अशा बेजबाबदार वर्तनावर कारवाई केली पाहिजे.प्रश्न इतकाच — कायदा रक्षक जरच नियम मोडतील, तर न्याय कुठे शोधायचा?