
मंत्री बावनकुळे आणि जुन्या मैत्रीचा अनोखा क्षण – माणुसकीचं जिवंत उदाहरण


वर्धा :(मंगेश चोरे)
राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपूर्वी वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून क्षण काढत त्यांनी एक अशी भेट दिली, जी आजच्या यांत्रिक युगात माणुसकी आणि नातेसंबंध जपणारा प्रेरणादायी प्रसंग ठरली.
वर्धा येथे महिला व बालकल्याण विभागात चालक पदावर कार्यरत असलेले श्री. चंद्रकांत मोहड हे लवकरच निवृत्त होत आहेत. केवळ दोन दिवसांचा सेवाकाल शिल्लक असताना, अचानक त्यांच्या दारात राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उभे राहिले. ही केवळ एक औपचारिक भेट नव्हे, तर बालपणीच्या मैत्रीचा सुंदर आविष्कार होता.
चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत मोहड हे दोघेही लहानपणी नागपूर जिल्ह्यातील प्रायमरी शाळेत एकत्र शिकले, एकत्र खेळले, आणि आयुष्यात वेगवेगळ्या वाटांनी पुढे गेले. एकजण राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला तर दुसरा साधा सरकारी कर्मचारी. या मोठ्या तफावतीच्या पार्श्वभूमीवरही, मैत्रीचं नातं तसंच राहिलं – शुद्ध, निर्व्याज, आणि उत्कट.
शुभेच्छा देण्यासाठी बावनकुळे स्वतः मोहड यांच्या घरी गेले. त्यांच्या तब्येतीची, घरच्यांची विचारपूस केली. एवढंच नव्हे तर त्यांनी जुन्या आठवणीही जागवल्या. हे पाहून उपस्थित सर्वांनाच भावूक व्हायला झालं.
मित्राच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर, मंत्र्यांनी दिलेली ही स्नेहभेट केवळ एक सामाजिक घटना नसून, माणसातील माणूसपण आजही टिकून आहे याचा प्रत्यय देणारी घटना आहे. मंत्री कोणत्याही पदावर असो, त्याच्या मनात जर मैत्रीचा, माणुसकीचा झरा सतत वाहत असेल, तर तेच खरे नेतृत्व म्हणावे लागेल.
ही भेट समाजात एक सकारात्मक संदेश देऊन गेली – की नातेसंबंध, प्रेम, आणि आपुलकी हीच खरी संपत्ती आहे. आणि ती जपली, तर जीवन खरोखरच सुंदर बनते.