
*एआय पत्रकारांचा प्रतिस्पर्धी नव्हे, सहायक !* डॉ. मनीष कुमार जैसल यांचे प्रतिपादन, पत्रकार संघ, ADIRA यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा
*एआय पत्रकारांचा प्रतिस्पर्धी नव्हे, सहायक !*
डॉ. मनीष कुमार जैसल यांचे प्रतिपादन, पत्रकार संघ, ADIRA यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा
वर्धा : डिजिटल युगातील आव्हाने आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेला नवी दिशा देण्यासाठी वर्धा श्रमिक पत्रकार संघ आणि ADIRA (AI for Digital Innovation and Responsible Awareness) यांच्या संयुक्त पुढाकाराने एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत वर्धा जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला आणि एआय-आधारित टूल्स वापरण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी या उपक्रमाला तांत्रिक आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाचे पाऊल संबोधले. त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळात बातमी निर्मिती, तथ्य पडताळणी आणि डिजिटल संपादन यांसारख्या प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पत्रकारांनी या तंत्रज्ञानात पारंगत होणे ही काळाची गरज आहे.
या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक डॉ. मनीष कुमार जैसल (प्रशिक्षक, ADIRA आणि मीडिया तज्ज्ञ) होते. त्यांनी पत्रकारांना ChatGPT, DALL•E, Whisper यांसारख्या प्रमुख एआय टूल्सबरोबरच फॅक्ट-चेकिंग, ऑटोमॅटिक स्क्रिप्टिंग आणि कंटेंट जनरेशन यासंबंधी सखोल माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “एआय हा पत्रकारांचा प्रतिस्पर्धी नाही, तर एक सहाय्यक आहे, जो पत्रकारितेला वेगवान, निष्पक्ष आणि तथ्याधारित बनवू शकतो.
ADIRA ही गुगल ऑर्ग आणि डेटा लीड्स यांच्या सहकार्याने चालवली जाणारा एक देशव्यापी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश पत्रकार, विद्यार्थी आणि मिडिया व्यावसायिकांना एआय आणि डिजिटल नवोन्मेषाबाबत जागरूक करणे, त्यांना प्रत्यक्ष कौशल्य देणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनवणे हा आहे. ADIRA विशेषतः स्थानिक आणि प्रादेशिक पत्रकारांच्या तांत्रिक सक्षमीकरणावर भर देते.
या कार्यशाळेदरम्यान पत्रकारांनी विविध एआय टूल्स वापरून प्रत्यक्ष रिपोर्ट तयार करणे, खोट्या बातम्यांची ओळख पटवणे आणि व्हिज्युअल कंटेंट तयार करणे यांचा अनुभव घेतला. सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये सहभागी पत्रकारांनी प्रश्न आणि शंका मांडल्या. हिंदी विद्यापीठाच्या नाट्य व सिनेमा विभागाचे प्रमुख डॉ. सतीश पावडे यांनी या प्रशिक्षणाला स्थानिक पत्रकारितेसाठी एक मैलाचा दगड असे संबोधले आणि भविष्यातही अशा कार्यशाळा घेण्याची गरज व्यक्त केली. राहुल खोब्रागडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.