
वर्धा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घेतली दुकान खाली करण्याची सुपारी? मागासवर्गीय कुटुंबावर बेकायदेशीर अत्याचाराचा गंभीर आरोप
वर्धा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घेतली दुकान खाली करण्याची सुपारी? मागासवर्गीय कुटुंबावर बेकायदेशीर अत्याचाराचा गंभीर आरोप
वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा शहरात पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप होत असून, एका मागासवर्गीय कुटुंबावर बेकायदेशीर दबाव व जबरदस्तीचा आरोप समोर आला आहे. पोलिस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने “सुपारी घेऊन दुकान खाली करण्याचा प्रकार” केल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. या प्रकरणात सब-इन्स्पेक्टर श्री. बानोद यांचे नाव आल्याने वर्धा पोलिसांची संपूर्ण यंत्रणा अडचणीत आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सेवाग्राम येथील अजय ताकसांडे हे मागील तीन वर्षांपासून वर्धा शहरातील सोशलिस्ट चौकात ठाकरे यांचे दुकान अधिकृतरित्या भाडे करून व्यवसाय करत होते. दरमहा वेळेवर भाडे देणाऱ्या ताकसांडे यांच्याशी मालक ठाकरे यांचे भाडेकरार संपल्यानंतर वाद निर्माण झाला. ठाकरे यांनी नव्या करारासाठी डबल भाड्याची मागणी केली, जी तात्काळ शक्य नसल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला.मात्र, या सिव्हिल प्रकरणात पोलीस हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दि. २८ जुलै २०२५ रोजी अजय ताकसांडे यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. ठाण्यात पोहचल्यावर सब-इन्स्पेक्टर बानोद यांनी कोणतीही तक्रार नसताना त्यांना शारीरिक मारहाण केली. तसेच, घरमालकाच्या पत्नीची तक्रार दाखल करत खोटा विनयभंगाचा गुन्हा लावण्याची धमकी दिल्याचे आरोप आहेत.या धक्कादायक प्रकारानंतर अजय ताकसांडे मुंबईला जाऊन थेट मागासवर्गीय आयोगात तक्रार दाखल केली. त्यांनी मानवाधिकार आयोगातही आपली कैफियत मांडली असून, पोलिसांच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील सादर केले. धक्कादायक बाब म्हणजे, ताकसांडे यांच्या दुकानातील कॅमेरे पोलिसांनी उचलून नेले, ज्यावर कायदेशीर अधिकार नसताना ही कृती करण्यात आल्याने आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या सर्व प्रकारामुळे वर्ध्यातील अनेक मागासवर्गीय संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकीकडे वर्ध्याचे पोलिस अधीक्षक दारू विक्रेत्यांचे पुनर्वसन करताना दिसतात, तर दुसरीकडे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांवर पोलिसच गुन्हे लावण्याचे कारस्थान करतात, अशी टीका होत आहे.पूर्वीही अशाच पद्धतीने बानोद यांनी सुरेश पवार व राहुल पवार यांचेही घर खाली करून दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे “घर किंवा दुकान खाली करण्याचाच नवा धंदा” या अधिकाऱ्यांनी सुरू केला की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.या प्रकरणाचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे ठाकरे यांच्याविरोधात जमीन व मालमत्तेच्या बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीचा आरोप देखील उघडकीस आला आहे. सेलसुरा येथील प्रकरणातही त्यांनी असाच प्रकार केला असल्याचे सांगण्यात येते.या सर्व घडामोडींमुळे वर्धा पोलिस ठाण्यातील बेकायदेशीर कारवाया, मागासवर्गीयांवर अन्याय, आणि पोलीस संरक्षणाऐवजी त्रास देण्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत हे प्रकरण राजकीय आणि सामाजिक वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्रमशः…