
गांजा वाहतुकीचा पर्दाफाश – वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची हिंगणघाटमध्ये धडक कारवाई
गांजा वाहतुकीचा पर्दाफाश – वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची हिंगणघाटमध्ये धडक कारवाई
वर्धा, (प्रति)अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात वर्धा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत 2.109 किलो गांजासह आरोपीस अटक करण्यात आली असून सुमारे ₹1.77 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या सूचनेनुसार पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. 5 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग दरम्यान हिंगणघाट हद्दीतील मोठा मारोती मंदिराजवळ, जाम–हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 च्या सर्व्हिस रोडवर गस्त घालीत होते. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी अंकुश अरुण मेश्राम (वय 34, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट) हा गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.
पोलीसांनी तत्काळ सापळा रचून रेड केली असता, आरोपी विना नंबरच्या हिरो डेस्टिनी स्कूटरवरून गांजाची वाहतूक करताना आढळला.चौकशीत त्याने सदर गांजा हा नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथे राहणाऱ्या सुरज नावाच्या इसमाकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून 2.109 किलो गांजा स्कूटर व मोबाईलसह एकूण ₹1,77,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पो.उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पो.अं. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित व अभिषेक नाईक यांनी केली.