
वर्धा ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अत्याचारामुळे आत्मदहनाचा निर्णय
मागासवर्गीय परिवार 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार ? पोलिस महानिरीक्षकांना निवेदन
विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांना आत्मदहनाचा इशारा दिलेले निवेदन हेच ते
वर्धा (प्रतिनिधी) वर्धा शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील व्यावसायिक अजय ताकसांडे यांनी वर्धा पोलिस ठाण्यातील.पोलिस अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक वागणुकीला कंटाळून येत्या १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण कुटुंबासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. या संबंधीचे निवेदन आज त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे.
प्राप्त माहितीनुसार अजय ताकसांडे हे सेवाग्राम येथील रहिवासी असून मागासवर्गीय समाजातून येतात. ते गेली तीन वर्षे वर्धा शहरातील सोशलिस्ट चौक परिसरात बांधकाम साहित्याचे भाड्याने देण्याचे व्यवसाय करीत आहेत. त्यांनी ठाकरे नावाच्या शिक्षक व्यक्तीकडून दोन गाळे भाड्याने घेतले होते. नुकताच या गाळ्याचा करार संपुष्टात आला आणि नव्याने करार करताना घरमालकाने अवाजवी भाडे मागितले.वास्तविक प्राप्त माहिती नुसार ठाकरे यांनी ही जागा खोट्या कागदपत्रावर हडप केली असून या जागेचा मूळ मालक आजही त्रस्त आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कायदेशीर मार्गाने नोटीस देवून कोर्टाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू केली होती.
या प्रकरणात पोलिसांचा काहीही संबंध नसताना, वर्धा पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री. पराग पोटे आणि पी.एस.आय. बानोद यांनी जबरदस्तीने अजय ताकसांडे यांना ठाण्यात बोलावून घेतले. त्याठिकाणी बानोद यांनी त्यांना अमानुष मारहाण केली आणि गाळा त्वरित रिकामा करा अन्यथा खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत अडकवू अशी धमकी दिली. ही धमकी केवळ तोंडीच नव्हे तर, अजय ताकसांडे यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिप्समधूनही स्पष्ट ऐकू येते की बानोद वारंवार खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत.
या गंभीर प्रकारामुळे घाबरून अजय ताकसांडे यांनी मुंबई गाठून मागासवर्गीय आयोग, मानवाधिकार आयोग तसेच विविध सामाजिक संघटनांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून वर्धा पोलिस प्रशासनातील भ्रष्टाचार आणि दबावतंत्रांची गहिरी जाळी उघडकीस आली आहे.यावर पुढील काळात कारवाई ती होणारच आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, वर्धा पोलिस ठाण्याच्या अलिखित परवानगीने अनेक अवैध धंदे – जसे की सुगंधित तंबाखू विक्री, वारली मटका, काही निवडक दारू विक्रेत्यांना बेकायदेशीर परवानग्या – हे चालत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, काही घरमालकांकडून मोठ्या रकमा घेऊन पोलिस अधिकारीच गाळे रिकामे करण्याच्या ‘सुपाऱ्या’ घेत असल्याच्या आरोपांचीही चर्चा आहे.वर्धा पोलिस स्टेशनमध्ये अनेक प्रकरणे खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने ‘सेटल’केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. हे केवळ भ्रष्टाचारच नव्हे तर लोकशाहीविरोधी कृत्य आहे. पोलिसांना कुठलाही अधिकार नाही की ते कुणाचीही खासगी जागा रिकामी करण्यास दबाव टाकू शकतील. तरीही, पोलिस अधिकारी व कर्मचारी याचसाठी ठाकरे कुटुंबीयांच्या सांगण्यावरून गेले हे स्पष्ट होते.
जेव्हा एक मागासवर्गीय व्यक्तीला पोलिस ठाण्यात डांबून अमानुष मारहाण केली जाते, खोट्या गुन्ह्यांची धमकी दिली जाते, तेव्हा हा प्रकार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट आहे.अजय ताकसांडे यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे वर्धा जिल्ह्यातील प्रशासनाची झोप उडणारआहे. नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुढील काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर प्रकरणात वर्धा पोलिस ठाण्याचे ठाणेदार पराग पोटे पी.एस.आय. बानोद यांच्यासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांची तपासणी आणि निलंबन आवश्यक झाले आहे. अन्यथा, पोलिस खात्यावरील विश्वासच उध्वस्त होईल. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष कारवाई करणे अत्यावश्यक आहे.अशी जनतेची.मागणी आहे.