
“पोलिसांच्या दडपणाचा बळी: निरागस महिलेचा मृत्यू
वर्धा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर बेकायदेशीर वर्तनाचे आरोप”
वर्धा (प्रतिनिधी – राजेश भोंबले):
न्याय मागण्यासाठी बनवलेली व्यवस्था आज अन्यायाचा अड्डा बनत आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारी एक अत्यंत वेदनादायक घटना वर्धा शहरात समोर आली आहे. दोन दिवसांपासून लक्ष वेधून घेत असलेल्या एका प्रकरणात आज एका निरागस महिलेचा जीव गेला आहे. या प्रकरणाचे सूत्रधार ठरू घातले आहेत वर्धा पोलिस ठाण्यातील काही अधिकारी, ज्यांच्यावर बेकायदेशीर दबाव टाकून धमकावल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
मृतक महिलेचे नाव सुनीता संजय ठाकरे(रा. वर्धा) असे असून, त्यांची प्रकृती आधीपासूनच ठीक नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी वर्धा पोलिस ठाण्यात कोणतीही नोटीस न देता जबरदस्तीने त्यांना बोलावण्यात आले. त्याठिकाणी ताकसांडे आणि नितीन ठाकरे यांच्या जागेच्या मालकी हक्काशी संबंधित सिव्हिल प्रकरणाचा संबंध असतानाही, पोलिसांनी गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी करत, महिलेला मानसिक त्रास दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी विचारले की, “तुम्ही अजय ताकसांडे यांच्याशी कोणतेही अग्रिमेंट केले आहे का? असल्यास ४२० अंतर्गत कारवाई करु” – अशा प्रकारे धमकावण्यात आले. यामुळे सुनीता ठाकरे यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज, त्यांच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी समोर आली.
या घटनेबद्दल अजय ताकसांडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “ही संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असून, नितीन ठाकरे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमतातून दबाव आणण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करण्यात आला.
ठाणेदार पराग पोटे यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सिव्हिल प्रकरणात गुंडांप्रमाणे वागत दुकान खाली करण्यासाठी धमकी व मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. ताकसांडे यांचे म्हणणे आहे की, “आपल्याला जागा खाली करण्यात काही हरकत नव्हती, मात्र पर्यायी व्यवस्था मिळेपर्यंत थोडा वेळ हवा होता.
या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट म्हणजे, मृतक महिलेच्या नातलगांनी स्पष्ट सांगितले आहे की, ‘विनयभंग’ बद्दल आम्ही काहीही म्हटले नाही, तरीही पोलिस ताकसांडे यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते.
या संपूर्ण प्रकरणाची CCTV फुटेज पोलिस ठाण्यातील कॅमेऱ्यात कैद झाली असल्याची शक्यता असून, सखोल चौकशीची मागणी आता जोर धरत आहे. हा केवळ पोलिस अत्याचार नाही, तर एकप्रकारे मनुष्यवधाचा प्रकार असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे.“पोलिस किती जीव घेणार?”
सध्या वर्धा शहरात नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पोलीस दलाची विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व या दोन्ही बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वर्धा पोलिस ठाण्यातील अधिकारी अजून किती लोकांचे प्राण घेणार? असा संतप्त सवाल आता जनतेच्या तोंडी आहे.संपूर्ण प्रकरणाचा तपास न्यायालयीन चौकशीमार्फत होणे गरजेचे.असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक संघटनांचे मत आहे.