
हिंदी विश्वविद्यालयात तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन मानव साखळी व देशभक्तीच्या नार्यांनी गुंजला परिसर
हिंदी विश्वविद्यालयात तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन
मानव साखळी व देशभक्तीच्या नार्यांनी गुंजला परिसर
वर्धा, (प्रतिनिधी)
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेसोबत साजरा करण्यासाठी आज (बुधवार) भव्य तिरंगा रॅली आणि मानव साखळीचे आयोजन करण्यात आले.रॅलीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत देशभक्तीचा जोश आणि देशाप्रती समर्पणाची भावना प्रदर्शित केली.तिरंगा हातात घेत “जय हिंद”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.रॅलीची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी भवनापासून झाली. प्रशासकीय भवन व वाचस्पती भवन मार्गे जात ती गांधी हिल्सवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाली. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे “हम सब एक हैं”चा संदेश देत मानव साखळी तयार करून एकता व बंधुतेचे दर्शन घडविले.शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, विश्वविद्यालयात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” अभियान राबविले जात आहे. 14 ऑगस्ट रोजी “विभाजन विभीषिका दिवस” पाळला जाणार असून, यासाठी वाचस्पती भवनात विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.रॅलीमध्ये डॉ. बालाजी चिरडे, डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. विधु खरे दास, डॉ. सूर्यप्रकाश पांडे, डॉ. राजेश्वर सिंह, डॉ. श्रीनिकेत मिश्र, डॉ. मुन्नालाल गुप्ता, डॉ. शिवसिंह बघेल, बी. एस. मिरगे, सुधीर खरकटे, राम कनोरिया, वृषाली, मोनिका यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले.या अभियानाचा समारोप 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर वृक्षारोपण कार्यक्रमाने होणार आहे. विश्वविद्यालयाने नागरिकांना या उपक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.