
वर्धा पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराची अमरावतीला बदली; ताकसांडे प्रकरणातून सुटका नाही
वर्धा पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराची अमरावतीला बदली; ताकसांडे प्रकरणातून सुटका नाही
वर्धा (प्रतिनिधी)< वर्धा पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री. पराग पोटे यांची अमरावती येथे बदली करण्यात आली असली तरी, अलीकडच्या काळात गाजलेल्या ताकसांडे प्रकरणातून त्यांची सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत या प्रकरणातील गंभीर आरोप, एका विधवा महिलेचा मृत्यू आणि मागासवर्गीय तरुणाला झालेली बेकायदेशीर मारहाण या सर्व घटनांनी जिल्ह्यात खळबळ माजवली आहे.
काही दिवसांपूर्वी वर्धा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आलेल्या अजय ताकसांडे या मागासवर्गीय तरुणाला ठाणेदार पराग पोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कथितपणे बेकायदेशीररित्या मारहाण केल्याचा आरोप आहे. हा वाद सिव्हिल स्वरूपाचा असून, त्यात पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केला असल्याची तक्रार स्थानिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीमती सुनीता ठाकरे या विधवा महिलेला 1 ऑगस्ट 2025 रोजी पोलिस ठाण्यात बोलावून धमकावण्यात आले. या मानसिक तणावामुळे त्यांची प्रकृती बिघडली व उपचारादरम्यान 7 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत ठाणेदार पोटे आणि त्यांचे सहकारी जबाबदार असल्याचा ठपका मानवाधिकार संघटनांनी ठेवला आहे.
या प्रकरणातील पीडित अजय ताकसांडे यांनी झालेल्या अन्यायाविरोधात 15 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून, जिल्हा प्रशासनावर आणि पोलिस विभागावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
या घटनेवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ (भारत) चे राज्याध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांनी पोलिस महासंचालकांना लेखी निवेदन देऊन सखोल, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी थेट मानवाधिकार आयोगात करण्यासाठी ताकसांडे यांना संस्थेच्या माध्यमातून मदत देण्याचे आश्वासनही दिले आहे.
संघटनेच्या निवेदनात असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, बदली ही शिक्षा नसून केवळ प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून, पीडितांना न्याय मिळवून देणे अत्यावश्यक आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व कायदेशीर वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. मागासवर्गीय समाजातील अनेक नेते व संघटना या प्रकरणात पुढे येण्याची शक्यता आहे.