
भिडी–पूलगाव मार्गावर पावसामुळे रस्ता खचला – सामाजिक कार्यकर्त्यांची तत्पर कारवाई
भिडी–पूलगाव मार्गावर पावसामुळे रस्ता खचला – सामाजिक कार्यकर्त्यांची तत्पर कारवाई
भिडी : (प्रतिनिधी – राजू वाटाणे)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिडी–पूलगाव मार्गावरील भिडी पाणीपुरवठा विहिरीजवळील वळणावर नाल्याला पूर आला. पूराचे पाणी डांबरी रस्त्यावरून वाहत गेल्याने रस्ता आतून खचला व मोठ्या भगदाडांनी विद्रूप झाला. या ठिकाणी जड वाहन गेल्यास जमिनीत गाडले जाण्याचा धोका निर्माण झाला होता.बुधवारी सकाळी सततधारा पावसामुळे ही परिस्थिती गंभीर झाली. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. भर पावसातच त्यांनी जड वाहन, शालेय बस व पूलगाव आगाराची बस या मार्गावरून थांबविण्याची माहिती सर्वत्र पोचवली. तसेच खचलेल्या रस्त्याजवळ दगड, झाडांची फांदी, लाकडी खोडे ठेवून व चुन्याने खूण करून वाहनचालकांना धोक्याचा इशारा देण्यात आला.या मार्गावरून ५ ते ६ गावांचा संपर्क भिडीशी असतो. शाळकरी मुले, रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण, तसेच दैनंदिन कामांसाठी जाणारे नागरिक यांचा प्रवास या रस्त्यावरून होत असतो. पूरामुळे झालेल्या भगदाडांमुळे मोठा अपघात होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील चोरे, अजय झाडे, मोहन चौधरी, राजू खडसे, शरद खडसे, गोविंदराव सोनोने, गजानन देवनळे, तसेच तलाठी कार्यालयातील मयूर गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक थांबवण्याची व सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतली.सर्व सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला त्वरीत रस्ता दुरुस्त करून मार्ग सुरळीत करण्याची मागणी केली आहे.