
रामनगर पोलिस ठाण्यातील प्रकारावर संशयाची छाया
रामनगर पोलिस ठाण्यातील प्रकारावर संशयाची छाया
वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा शहरातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रामनगर पोलिस ठाण्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून थेट आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादानंतर 135, 109(1), 3(5), 324(4), 351(3), 352 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असताना, एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने आरोपीकडून फोन-पे द्वारे पैसे स्वीकारल्याचे उघड झाले आहे. यासंबंधी संभाषणाच्या काही ऑडिओ क्लिप्स चर्चेत असून, वरिष्ठांनाही देणे असल्याचे त्यात ऐकू येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा मुद्दा इतका गंभीर झाला आहे की, याची दखल जिल्ह्यातील एका तडफदार आमदारापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात अधिकृतरीत्या चौकशी सुरू झाली आहे का, यावर पोलीस प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, रामनगर परिसरात दारू, एम.डी. विक्री आणि इतर अवैध धंदे वाढत चालल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. गोरस भंडार रोडवरील नाश्ता स्टॉल हे ठिकाण या गोंधळाचे प्रमुख केंद्र बनले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे नागरिकांमध्ये संभ्रम व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, “या सर्व प्रकाराकडे नक्की लक्ष कोण देणार?” असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.