
शरद पवार यांची ‘गुगली’; जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले, देशमुख गटाचे पक्षत्यागाचे संकेत
शरद पवार यांची ‘गुगली’; जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले, देशमुख गटाचे पक्षत्यागाचे संकेत
(मंगेश चोरे पाटील) –
वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात दिवाळीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठा भूकंप घडला आहे. शरद पवार यांनी टाकलेली ‘गुगली’ अशी परिणामकारक ठरली की, देशमुख गटाने पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाध्यक्ष पदावर अतुल वांदिले यांची नियुक्ती करताना पक्षाने जुना कचरा साफ करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. पक्षात नवीन लोकांना प्रवेश देण्यास बंदी आणि इतरांची प्रगती न झेपणाऱ्या देशमुख गटामुळेच वर्ध्यात पक्षाची वाढ खुंटली होती, हे उघड सत्य असल्याचे नेतेगण म्हणतात.काही काळ वर्ध्यात सहकार क्षेत्रात देशमुख गटाचे वर्चस्व होते. प्रा. सुरेश देशमुख आमदारही झाले होते. मात्र, काळ बदलला, ‘हुजूर’गिरी करणारे लोक कमी झाले, आणि देशमुख गटाच्या बँकेने शेतकऱ्यांचे पैसे अडकवल्याचे आरोप झाले. त्यांचा मुलगा समीर देशमुख आमदार होण्यासाठी पक्ष सोडून गेला होता. त्यानंतर बहुमताने पराभूत होऊन पुन्हा पक्षात परतला. आता तोच जिल्हाध्यक्ष व्हावा, अशी मागणी प्रा. सुरेश देशमुख करीत आहेत.
पण, शरद पवार यांच्या निर्णयाने जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्त्वात पक्षात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ‘तुतारी’ या चिन्हाला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा प्रतिष्ठा मिळत आहे.
देशमुख गटाच्या घराणेशाहीविरुद्ध पक्षातील अनेक नेते असंतोष व्यक्त करत होते. हिंगणघाटमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले प्रा. राजू तिमांडे यांनीदेखील याच कारणामुळे पक्ष सोडला होता. हा असंतोष पक्षप्रमुखांच्या लक्षात आल्याने, बदल अनिवार्य झाले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रा. सुरेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत, वांदिले यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली. आपला मुलगा समीर देशमुख यालाच जिल्हाध्यक्ष करायला हवे होते, असे ते म्हणाले. आणि, ही नियुक्ती बदलली नाही तर आम्ही पक्ष सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित होतो – देशमुख गट पक्ष सोडल्यास कोणत्या पक्षात जाणार? आणि त्यांना कोणता पक्ष प्रवेश देणार?
एकूणच, शरद पवार यांनी दिवाळीच्या तोंडावर टाकलेली ही ‘गुगली’ वर्धा जिल्ह्यात सर्वच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अधिक मजबूत होत असून, नव्या नेतृत्त्वाच्या आधारावर पक्षाची पकड पुन्हा वाढू लागली आहे.