
कोरपना तालुक्यात धुंवाधार पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात
कोरपना तालुक्यात धुंवाधार पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात
(चंद्रपूर )प्रतिनिधी मनोज गोरे
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून काही भागात नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पसरले आणि गावोगावी अंधार व भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या साऱ्या संकटाचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या पिकांना. आशेने लावलेली तूर आता जळण्याच्या मार्गावर आहे. कपाशी, सोयाबीन, मूग या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे व खते टाकली होती, ते स्वप्न या धुंवाधार पावसाने क्षणात पाण्यात गेले. शेतात पाणी साचल्याने मशागतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. रात्रंदिवस मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहून शेतकरी पोराबाळासारखे हंबरडा फोडत आहेत. काही ठिकाणी बांधावर उभा राहून शेतकरी स्वतःच्या डोळ्यांतून पाणी पिकांसोबत वाहताना अनुभवत आहेत. त्यांच्या वेदना केवळ शेतातील नुकसानीपुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्या घरातील संसाराच्या गाठीशी, लेकरांच्या शिक्षणाशी, आणि उद्याच्या दोन वेळच्या भाकरीशी जोडलेल्या आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने मदतीचे धोरण ठरवणे आणि पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे हाच एकमेव मार्ग आहे. अन्यथा या नैसर्गिक आपत्तीने उरलेसुरले शेतकरी जीवन अधिकच खचून जाईल.