
सिंदी नगरपरिषदेत बेकायदेशीर पार्किंग वसुली?
सिंदी नगरपरिषदेत बेकायदेशीर पार्किंग वसुली?
पठाणी वसुली थांबवण्याची मागणी; नागरिक त्रस्त,
सिंदी :(प्रति)
नंदी पोळ्याच्या दिवशी सिंदी नगरपरिषदेतर्फे नागरिकांकडून वसुली होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक सुधाकर वाघमारे यांनी केला आहे. मोटारसायकलसाठी ३० रुपये आणि चारचाकीसाठी ४० रुपये पार्किंग फी आकारली जात असून, ही जागा नगरपरिषदेचीच नाही, शिवाय तिथे शेड, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, शौचालय अशा कोणत्याही सुविधा नाहीत.
“हे नागरिकांवर लादलेले अन्याय्य ओझे असून, ही सरळसरळ गुंडगर्दी व चोरी आहे,” असा आरोप वाघमारे यांनी आमदार, एस.डी.पी.ओ. यांच्या उपस्थितीत नगर परिषद सभेत केला.
त्यांनी सांगितले की, बाहेरील पाहुणे गावात पोळा पाहण्यासाठी येतात. रेल्वे फाटकाच्या पलीकडे गाड्या लांबवर उभ्या करून मुलांना घेऊन नागरिक गर्दीतून गावात येतात व मध्यरात्री पुन्हा परत जातात. मात्र सकाळी वाहनांचे आरसे तुटलेले, टायर पंक्चर, पेट्रोल गायब अशी चित्रे दिसतात.वाघमारे यांनी नगरपरिषदेत झालेल्या अनेक कामांतील भ्रष्टाचाराची उदाहरणे मांडली :
-
३५ लाख ५० हजार रुपये खर्च करून जलशुद्धीकरण इमारतीचे काम; पण जीएसटी व साहित्याची माहिती देण्यास टाळाटाळ.
-
२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला मजला असूनही इमारतीत अजूनही पाणी गळती.
-
स्टेडियमवरील लाखो रुपयांचे टिनशेड गायब; बगीचा आणि नवीन शौचालयाच्या नावावर भ्रष्टाचार.
-
गटारावर चुकीची कामे करून १० लाखांचा भ्रष्टाचार.
-
कचरा डेपोवर लाखो रुपयांचा कागदोपतरी खर्च; पण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे रस्ते.
-
खोट्या नळमीटरवर प्रति मीटर ३९०० रुपये शासनाकडून लाटल्याचा आरोप.
-
गावठाण मोजणीतील अनियमितता; २७ ते २८ लाख रुपये ठेकेदार कंपनीस देण्यात आले.“मी मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली; मात्र अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. अधिकारी बदलत राहतात, पण गावाची परिस्थिती तशीच आहे. पाहुण्यांच्या नजरेत गावाची प्रतिमा खराब होत आहे,” असे वाघमारे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, जर योग्य तो निर्णय झाला नाही तर गाव मोजणीच्या संदर्भात उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे .गावकऱ्यांचा सरळ प्रश्न आहे की, गावातील जीवनावश्यक प्रश्नांकडे नेते का लक्ष देत नाहीत? केवळ निवडणुकीच्या काळातच नेते कार्यकर्ते का जागे होतात? संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नागरिकांना न्याय मिळावा, भ्रष्टाचारावर कारवाई व्हावी, बेकायदेशीर पार्किंग वसुली थांबवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.