
वर्धा पोलिस अधीक्षक सक्रिय; आमली पदार्थ विक्रेत्यांची आता खैर नाही!
वर्धा पोलिस अधीक्षक सक्रिय; आमली पदार्थ विक्रेत्यांची आता खैर नाही!
वर्धा (प्रतिनिधी मंगेश चोरे पाटील):
वर्धा शहरात धोकादायक आमली पदार्थांचा जाळ वाढत असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत पोलिसांनी एम.डीसह विविध आमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना जेरबंद केले. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एकप्रकारे खळबळ माजली असून, आगामी काळात या धंद्यावर कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.शहरातील रामनगर परिसर हा अवैध धंद्यांचा अड्डा बनल्याचे उघड झाले आहे. मात्र या पोलीस ठाण्यात नियंत्रणाचा अभाव असल्यामुळे लहान अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्यापासून मागे हटत असल्याचे आवाज आतूनच उठू लागले आहेत.इतिहासाचा वारसा लाभलेल्या या शहरात दुर्दैवाने उघड्यावरही गैरव्यवहार सुरू असल्याचे चित्र आहे. गांधी काळात उभारण्यात आलेल्या बजाज बालमंदिर शाळेच्या समोरच पाणठेल्यावर खुल्या आमदानीने वीस ते शंभर रुपयांपर्यंत खर्रा विक्री होत असल्याचे दृश्य सर्वांनाच दिसते. याशिवाय रात्रीच्या वेळी उभी राहणारी अनधिकृत चौपाटी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा प्रश्न बनली आहे. कॉलेजच्या तरुण-तरुणींची याठिकाणी होणारी गर्दी आणि गुप्त व्यवहार शहराच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरातील काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला आहे की, येथे केवळ खाण्याचेच नव्हे तर पाण्यात मिसळून देण्यात येणारे संशयित पदार्थही विकले जातात. ही बाब अत्यंत गंभीर असून या सर्व भागात रामनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी असताना सुद्धा सतर्कतेचा पूर्ण अभाव जाणवतो. त्यामुळे “कारण काय?” हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.तथापि, वर्ध्याचे पोलिस अधीक्षक आता स्वतः पुढाकार घेत आमली पदार्थ विक्रेत्यांना अटक करत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून, हा बेकायदेशीर धंदा मोडीत निघण्याची चिन्हे दिसत आहेत.