
अखेर माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
अखेर माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
वर्धा (मंगेश चोरे)
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्रा. राजूभाऊ तिमांडे यांनी अखेर शरद पवार गटाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेले प्रा. तिमांडे हे पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. मात्र, अलीकडील विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारीसाठी आपला दावा करूनही पक्षश्रेष्ठींनी जाणीवपूर्वक डावलल्याचा त्यांनी आरोप केला. पक्षातील काही नेते व कार्यकर्ते आपला विरोध करीत असल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“पुढील काळात शरद पवार गटात मला संधी मिळेल, अशी शक्यता नाही. मात्र, मला जनतेसाठी कार्य करायचे आहे. त्या दृष्टीने अजित पवार गट पोषक असल्याने मी हा निर्णय घेतला आहे,” असे प्रा. तिमांडे यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या प्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.