
“साहेब! अंगावर कपडेच उरलेत, तेही घेऊन जा!” – आर्वीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
“साहेब! अंगावर कपडेच उरलेत, तेही घेऊन जा!” – आर्वीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
आर्वी (प्रतिनिधी) :
“शासनाच्या दुर्लक्षामुळे आता आमच्याकडे फक्त अंगावरचे कपडेच उरलेत… आता तेही घेऊन जा!” – अशा संतप्त शब्दांत आर्वीतील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात प्रशासनाला धारेवर धरले. माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मोझरी येथे सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना, आर्वी येथे शेतकऱ्यांनी कपडे काढून प्रशासनाच्या स्वाधीन करत अभिनव आणि जळजळीत आंदोलन केले.बाळा जगताप यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी आपल्या अंगावरील कपडे तहसीलदारांच्या समोर उतरवून शासनाच्या ‘बधीर’ आणि ‘निर्लज्ज’ प्रशासनाचा निषेध केला.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्याआंदोलनातील शेतकऱ्यांच्या १७ प्रमुख मागण्यांना पाठिंबा देताना आर्वीतील शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणशून्यतेवर ताशेरे ओढले. मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मासिक मानधन, हमीभावावर २०% अनुदान, शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ, ग्रामीण घरकुलासाठी ५ लाखांचे अनुदान, तरुणांना रोजगार व भरती यांचा समावेश आहे.शासन निर्णयाची मागणी:
“७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांप्रमाणे तातडीने शासन निर्णय निघावेत,” अशी स्पष्ट मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. सरकार केवळ आश्वासनांवर वेळकाढूपणा करत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद:
या तीव्र आंदोलनात बाळा जगताप यांच्यासह सुधीर जाचक, विक्रम भगत, संजय कुरिल, कुणाल चव्हाण, राजेश आगरकर, गुड्डू पठाण, अबरार खान, अंकुश गोटेफोडे, मंगेश कोल्हे, प्रफुल कुंबोत, धीरज गिरडकर, प्रवीण वाघ, शेख कलीम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शासनाने ऐकले नाही, तर संघर्ष आणखी तीव्र होईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.