
सावंगी ठाणेदारांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान – दोन तडीपारांना त्वरीत अटक
सावंगी ठाणेदारांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान – दोन तडीपारांना त्वरीत अटक
वर्धा (प्रतिनिधी):
शहरातील उपद्रवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंगी पोलिस ठाण्याने अलीकडेच प्रभावी कारवाई करून आपली ठसठशीत छाप सोडली आहे. ठाणेदार श्री. पंकज वाघोडे यांनी दोन तडीपारांना अल्पावधीतच अटक करून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री. अनुराग जैन यांनी त्यांचा सन्मान केला.याआधी सालोड परिसरात झालेल्या खुनाच्या तपासातही ठाणेदार वाघोडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आरोपी पालोटी जंगलात लपले असतानाही ठिकठिकाणी दक्षता ठेवून, नवे तंत्र वापरून, पोलिसांनी आरोपींचे पलायनाचे सर्व मार्ग बंद केले. अखेर दोन दिवस जंगलात लपून बसलेल्या आरोपींना पोलिसांसमोर शरणागती पत्करावी लागली. या धाडसी कारवाईबद्दलही अधिक्षकांनी त्यांचे कौतुक केले होते.दरम्यान, परिसरात नाहक दहशत माजवणाऱ्या दोन तडीपारांविरोधात नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानुसार अधिक्षकांनी त्वरीत कारवाईचे आदेश दिले. ठाणेदार वाघोडे यांनी दोन पथके तयार करून कमी वेळेत दोन्ही तडीपारांना पकडले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना रवाना करण्यात आले.याच काळात गणेशोत्सवात हजारो भाविकांची गर्दी असूनही एकही मोठी घटना घडली नाही. यंदा तर पाकिटमारी किंवा किरकोळ चोरटी कृत्ये सुद्धा नोंदली गेली नाहीत. नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे आणि संयमाचे कौतुक केले आहे.सावंगी पोलिस ठाण्याच्या या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेला नवा आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे